Ad will apear here
Next
रक्तामध्ये ओढ मातीची...
फोटो : मराठी विश्वकोशकविता स्वरांनी मोहरते म्हणजे नेमकं काय होतं हे अनुभवयाचं असेल तर ‘रक्तामधली ओढ मातीची’ ही कविता ऐकायलाच हवी. कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतिदिन १३ जुलैला होऊन गेला. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात इंदिरा अक्कांच्या ‘मृण्मयी’ या कवितेबद्दल...
...........
जुलै महिना म्हणजे आषाढमेघांनी ओथंबलेलं आभाळ आणि अनेक आठवणींनी दाटून आलेलं आपल्याही मनाचं आभाळ...सरीवर सरी बरसू लागतात, आभाळातून आणि आपल्या डोळ्यांतूनही. एक अनामिक हुरहुर दाटून येते. शाळेतले, कॉलेजातले दिवस आठवतात...संसारातील सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर मन कधी झोके घेऊ लागतं, तर कधी बरसणाऱ्या पाऊसधारांमध्ये चिंब होतं...अशा वेळी माझी पावलं घरातल्या पुस्तकांच्या कपाटाकडे वळतात, मला खुणावतात. अनेक कवितासंग्रह मी वेड्यासारखी वाचत राहते. माझ्या आवडत्या कवयित्री इंदिरा संतांच्या कविता तर हमखास! १३ जुलै हा  इंदिरा संतांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणजे त्यांच्या कवितांचं आस्वादन, मनन, चिंतन...त्यांच्या कविता वाचता वाचता कानात येऊ लागते पद्मजा फेणाणी यांच्या समंजस स्वरातली ‘मृण्मयी’ ही कविता...

रक्तामध्ये ओढ मातीची 
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन....

इंदिरा संतांची ही ताजी टवटवीत कविता, मातीशी नातं सांगणारी. इंदिरा संत यांना सारे जण अक्का म्हणत. मला आठवतोय १९९५मध्ये नाशिकमधल्या कवी कालिदास नाट्यगृहात संपन्न झालेला तो अविस्मरणीय सोहळा. इंदिरा अक्कांना कवी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने प्रदान केलेला ‘जनस्थान’ पुरस्कार...व्यासपीठावर आम्ही पाहिल्या शांत समईसारख्या दिसणाऱ्या इंदिरा अक्का आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व कवी कुसुमाग्रज! पायावर डोकं ठेवून नमस्कार करावा अशा त्या दोन व्यक्ती!! त्या वेळी मला वाटलं होतं, गोदावरीच्या काठी काव्यगंगेचा सन्मान होतोय. खरंच काय वर्णावा तो जनस्थान पुरस्कार सोहळा! एक तर कुसुमाग्रजांची मंगलमय उपस्थिती आणि त्यांच्या नावाचा स्पर्श त्या पुरस्काराला होता आणि इंदिरा अक्कांना तो प्रदान करण्यात आल्यानंतर त्या पुरस्काराचं पावित्र्य शतगुणित झालं.

आम्हाला शाळेत इंदिरा संतांची एक कविता होती. ‘तुझ्या घराला वाट जातसे पांदीपांदीतुनी, नाजुक वेलीवरी लगडल्या गुंजा दो बाजूंनी...’ शाळा सुटण्याआधी कविता म्हणायचा तास असायचा. गुरुजी मोठ्यानं म्हणायचे, आम्ही त्यांच्यामागून म्हणायचो. कविता अगदी तोंडपाठ होऊन जायची. या कवितेच्या पानावर ‘एक छानशी झोपडी, एक तरुणी आणि तिच्या पायाशी खेळणारं एक गोड कोकरू,’ असं चित्र होतं... ‘चला, कविता म्हणा’ असं गुरुजी म्हणाले, की आम्ही ती कविता म्हणायचो...खूप आवडायची ती कविता. कवितांचं वेड शालेय जीवनापासून लागलं ते आजतागायत...नागरी जीवनाचं बेगडीपण आणि निसर्गाच्या सान्निध्यातलं खरंखुरं, हवंहवंसं साधेपण यातला फरक इंदिरा संतांच्या कवितेतून समजला. १४ ओळींचं सुनीत अर्थात सॉनेट या काव्यरचनेत बांधलेल्या त्यांच्या कविता केवळ अविस्मरणीय. त्यांच्या कवितेचा ‘गर्भरेशमी’ ‘शेला’ कितीतरी वेळा मी ओढून बसते. त्यांच्या कवितांनी ‘रंगबावरी’ झालेली ‘मेंदी’ निरखण्याचा छंदच जणू मला लागलाय. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर...

होऊन माझ्यातून निराळी
मीच घेतसे रूप निराळे
तुझ्या संगती सदा राहते
अनुभविते ते सुखचि आगळे!

अक्का स्वत:च आपल्या कवितांविषयी म्हणतात, ‘स्वत:ला विसरून जाण्याच्या, स्वत:भोवतीच्या सर्व पाशातून मुक्त होण्याच्या तीव्र जाणिवेतून कविता लिहिली गेली. माझी प्रत्येक कविता ही त्या मनोवृत्तीच्या लहरीची अभिव्यक्ती आहे. तो क्षणिक भाव, ती अनुभूती शब्दात साकार करण्याची मला आता सवय लागली आहे.’ इंदिरा संतांच्या कवितेमधून अभिव्यक्त झालेली आहे प्रीती आणि निसर्ग...निसर्गप्रतिमांमधून व्यक्त होता होता प्रीतीची भावना नकळत अभिव्यक्त होत राहते. ‘रक्तामध्ये ओढ मातीची...’ असं सांगताना निसर्गातील ऋतूंचे इतके सुंदर विभ्रम शब्दबद्ध केले आहेत, की आपण चकित होतो. काव्यप्रतिभेचा फुलोरा पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. 

कोसळतांना वर्षा अविरत
स्नान समाधीमध्ये डुबावें
दवात भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे।।

या ओळींमधील वर्षा, शरद या ऋतूंचा अनुभव पद्मजा फेणाणी यांच्या गळ्यातून संगीतकार गिरीश जोशी यांनी असा काही स्वरबद्ध केलाय की लाजवाब! वर्षा ऋतूतील स्नानसमाधी अनुभवावी ती या कवितेतून. दवात भिजलेल्या प्राजक्ताचा नाजूकपणा न्याहाळावा, तर याच कवितेतून. वसंत, हेमंत ऋतूंचं वर्णन करताना किती सुंदर, साध्यासुध्या स्त्रीसुलभ आणि चपखल उपमा कवयित्रीनं वापरल्या आहेत...

हेमंताचा ओढून शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातल्या फुलाफुलांचे
छापील उंची पातळ ल्यावे।।

हेमंतातली थंडी, वसंतातलं पुष्पवैभव गातागाता पद्मजा फेणाणींचा स्वर इतक्या नाजुकतेनं फिरत ग्रीष्माच्या नाजूक टोपलीवर कचभार कसा उदवावा हे सांगतो, तर ‘जर्द विजेचा मत्त केवडा’ या शब्दांचा उच्चार करताना लख्ख विजेसारखा त्यांचा स्वर लागतो. निसर्गाचं विविध ऋतूंमधलं सौंदर्य अनुभवताना आपण मंत्रमुग्ध होतो. इंदिरा संतांचे शब्द, पद्मजा फेणाणी यांचा स्वर आणि गिरीश जोशी यांचं संगीत...कविता स्वरांनी मोहरते म्हणजे नेमकं काय होतं हे अनुभवयाचं असेल तर ‘रक्तामधली ओढ मातीची’ ही कविता ऐकायलाच हवी. निसर्गाचे विभ्रम न्याहाळता न्याहाळता कवितेच्या शेवटच्या ओळी मात्र हृदय हेलावून टाकतात. विरहाचा, वेदनेचा शाप संवेदनशील मनाला का छळतो, असं त्या नियतीला विचारावं वाटतं. मातीची ओढ आहे, तिच्यातूनच आपण जन्मलो, अंकुरलो, वाढलो, या मातीनं बहाल केलेलं ऋतूंचं वैभव अनुभवताना लाख स्मृतींचे काजवे पदरात घेऊन इंदिरा संतांची कविता सांगते...

आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला घ्यावे तुजला घ्यावे। 

लाख स्मृतींना धारण करणारी विरहव्याकुळता या कवितेच्या शेवटच्या ओळींमधून कवयित्रीनं अशी काही व्यक्त केलीय, की आपलेही डोळे नकळत भरून येतात, हात जोडले जातात, प्रतिभावंत इंदिरा संत यांच्यासाठी, रसिकप्रिय अक्कांसाठी! विरहवेदना व्यक्त करताना कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, आक्रंदन नाही, दु:खाचं बटबटीत प्रदर्शन नाही...सौम्य, शांत तेवणाऱ्या समईसारखं, अक्कांच्या व्यक्तिमत्त्वासारखंच त्यांचं कवितेतून व्यक्त होणं मनाला खूप भावतं. ‘आत्मकेंद्री नाही, तर आत्मनिष्ठ अशी त्यांची कविता आहे’ असं कवी मंगेश पाडगावकर यांनी म्हटलंय. खरंच आत्मकेंद्रीपणाला स्वार्थाचा वास आहे, तर आत्मनिष्ठेला पावित्र्याचा, मांगल्याचा आणि मृद्गंधाचा सुवास आहे. इंदिरा संत यांचा १३ जुलैला स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त ‘मृद्गंधाचा’ दरवळ अनुभवायचा असेल, तर ऐकू या स्वरांनी मोहरलेली ही कविता...

मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन....

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)



 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZOFBE
 अप्रतिम लेख.खूप दिवसांनी असे शाळेत बसून कविता शिकल्यासारखे वाटले .धन्यवाद1
 खुप गाणी , कविता ऐकल्या जातात..पण कविता स्वरांनी जेव्हा सजते.."तिचं" ते सौंदर्य जेव्हा तुम्ही शब्दबद्ध करता तेव्हा खरंच छान वाटतं... मस्तच !!!1
 Kavitecha rasagrahan atishay sunder. Dr. Pratima Jagtap yancha awajhi khoop god aahe. Amhi tyanche karyakram Pune Akashwanivar aikat asato.1
 Indira sant ani padmajataimy favourite..very nice..app1
 खूप छान ....मन भरून आले .
Similar Posts
दारा बांधता तोरण... निसर्ग अन् प्रीतीची अभिव्यक्ती हे ज्यांच्या कवितांचं वैशिष्ट्य, त्या कवयित्री इंदिरा संत (अक्का) यांचा चार जानेवारीला जन्मदिन आहे. त्या दिवसाचं, तसंच नुकत्याच सुरू झालेल्या नववर्षाचं औचित्य साधून ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या ‘दारा बांधता तोरण’ या अक्कांच्या कवितेचा...
घाल घाल पिंगा वाऱ्या... अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल...
फिरुनी नवी जन्मेन मी... वैविध्यपूर्ण गाणी गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आठ सप्टेंबर हा जन्मदिवस नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ ही सुधीर मोघे यांची सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशाताईंच्या स्वरांनी सजलेली कविता ...
मी गाताना गीत तुला लडिवाळा... वास्तवतेचे चटके सोसूनही मन निबर होऊ न देता संवेदनशीलता ज्यांनी जपली त्या कविवर्य ना. धों. महानोरांचा १६ सप्टेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील त्यांच्या ‘मी गाताना गीत तुला लडिवाळा’ या अंगाईबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language